महत्त्वाचे

वागजवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश; मात्र उपसा सिंचनाच्या मोटारींचा वीजपुरवठा अद्याप सुरूच!


वागजवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश; मात्र उपसा सिंचनाच्या मोटारींचा वीजपुरवठा अद्याप सुरूच!

राजगड तोरणा एक्स्प्रेस : भोर

भोर किकवी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शासन आदेशाची अंमलबजावणी कधी होणार का स्थानिक गाव गुंड नेत्यांचा महावितरण अधिकाऱ्यांना दम दाटी चां प्रयत्न सुरू आहे अशा चर्चेला शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये उधाण आले आहे.
राज्यात सुपर अल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भोर तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, नागरिकांना पिण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी उपलब्ध जलसाठा राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या जलसंपदा विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार वागजवाडी लघुपाटबंधारे तलावातील शिल्लक पाणीसाठा प्रामुख्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर तलावाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनांवरील मोटारींचा विद्युत पुरवठा तात्काळ खंडित करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, या आदेशानंतरही महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप उपसा सिंचन योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनण्याची शक्यता आहे. तलावातील उपलब्ध पाणीसाठा शेतीसाठी वापरला जात राहिल्यास भविष्यात नागरिकांना आणि जनावरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
एकीकडे शासन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत पाणीसाठा राखीव ठेवण्याचे आदेश देत असताना दुसरीकडे विद्युत पुरवठा सुरूच असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महावितरण प्रशासनाने शासन निर्णयाची तातडीने दखल घेऊन वागजवाडी तलावाच्या कार्यक्षेत्रातील उपसा सिंचन योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करावा आणि पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या जलसाठ्याचे संरक्षण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुष्काळाच्या संकटात पाण्याचे योग्य नियोजन आणि उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून, संबंधित विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *