भोर तालुक्यात राज्य सरकारने केला दुष्काळ जाहीर
भोर तालुक्यात राज्य सरकारने केला दुष्काळ जाहीर
राजगड तोरणा एक्सप्रेस : भोर
- महाराष्ट्रात जवळजवलं 265 तालुक्यात दुष्काळ परिस्थिती झाल्याचे राज्य शासनाला मिळालेल्या अहवालात दिसून आले त्या अनुष्णगाने 25 सप्टेंबर 2026 रोजी राज्य शासनाने पुणे जिल्यातील 8 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून या यादीत भोर वेल्हे बारामती इंदापूर पुरंदर दौड खेड शिरूर या तालुक्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. पुणे जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
भोर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने भोर तालुक्यातील अनेक भागांतील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पावसाअभावी शेतातील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके करपून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने भोर तालुक्याचा गांभीर्याने विचार करून दुष्काळ जाहीर केला आहे .
यंदा पावसाच्या सुरुवातीच्या कालावधीत झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. पिकांना आवश्यक वेळी पाऊस न मिळाल्याने सोयाबीन, भात, भुईमूग, मका, बाजरी तसेच अन्य खरीप पिकांवर परिणाम झाला आहे.
विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या डोंगराळ व दुर्गम भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे चित्र आहे. काही शेतांमध्ये पिके सुकू लागली असून अनेक ठिकाणी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीचा वाढता खर्च झालेला असताना पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्यातील नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करून पीक विमा, शासकीय नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजनांचा लाभ तातडीने मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.
पाऊस लांबल्यामुळे शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. गवत सुकत असल्याने पशु पालकांमध्येही चिंता वाढली आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता याबाबत प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.
शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेत तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.





